Sunday 10 March 2024

पियू बोले,पिया बोले

आपल्याकडे एकूणच *नवनिर्मिती* या शब्दाबद्दल बरीच उत्सुकता दाखवली जाते. क्वचित शोध घेण्याचा प्रयत्न होतो, जो कधी विफल होतो तर कधी पूर्णत्वास जातो. मूळ मुद्दा असा आहे, विशेषतः *ललित* संगीतात, नवनिर्मिती म्हणून काही अस्तित्वात येते का? मूळात नवनिर्मिती म्हणून जे काही आपल्या समोर येते, त्यात सत्य किती आणि आभास किती? असे तर नव्हे, नवनिर्मितीच्या नावाने मोठ्या आवाजात ढोल बडवला जातो? निर्मितीच्या खोलात जायचे म्हणजे निर्मितीचा संपूर्ण आवाका जाणून घेऊन, त्याचा *तळ* गाठण्याचा प्रयत्न करणे होय. त्यासाठी शोधक वृत्ती आणि मनावर संयम ठेवणे गरजेचे असते. थोडक्यात, हा शोध घेणे, ही व्यापक बौध्दिक मागणी करते आणि बहुतेकवेळा त्याचीच वानवा आढळते. ललित संगीतात तर बरेचवेळा सावळागोंधळ बघायला मिळतो. एकतर, ललित संगीत हा देखील बौद्धिक आविष्कार असतो, हे समजून घेतले जात नाही. त्यामुळे आस्वाद गंभीर आणि वैचारिक परिभाषेत घेतला जात नाही. आजचे आपले गाणे *पियू बोले, पिया बोले* हे गाणे ऐकताना, वरील मुद्दे विचारार्थ ठेवावेसे वाटतात. आता गाण्यातील कविता, हा मुद्दा विचारात घेतल्यास, रचनेतील *लय* लगेच ध्यानात येते. ललित संगीतातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, असे म्हणता येईल. योग्य जागी नेमके *खटके* येतात. परिणामी स्वररचना करताना, संगीतकाराला मोकळीक मिळते. काही ठिकाणी शब्दांची उलटापालट केलेली, वाचायला मिळते! अर्थात त्यामुळे वेगळा आशय हाती येत नाही. केवळ सांगितिक तडजोड असेच म्हणावे लागेल. कविता संवादात्मक आहे आणि प्राणी थाटाचे असल्याने, एकमेकांना *जाणून* घेण्याच्या इच्छेपोटी कवितेची धाटणी बांधलेली आहे. परिणामी, वाचायला सकस कविता, याची इच्छापूर्ती फारशी होत नाही. *थोड़ा वो घबराई, थोड़ा सा शरमाई, उछली यहाँ से वहाँ* सारखी ओळ उदाहरण म्हणून बघता येईल. गाण्याची खरी खुमारी ही स्वरचनेत आहे. मी सुरवातीला नवनिर्मितीचा जो मुद्दा मांडला होता, त्याचे उदाहरण म्हणून याला गण्याचा निर्देश करता येईल. या गाण्याची मूळ चाल, रवींद्र संगीतातील *फ़ुले फ़ुले, डोले डोले* या गाण्यावर आधारित आहे. आता गाण्याचे मूळ स्थान मिळाले म्हणजे संगीतकार शांतनू मोईत्रा, यांची सर्जकता काहीही नाही, हा निष्कर्ष चुकीचा ठरेल. मी या बंगाली गाण्याची लिंक लेखाच्या शेवटाला देत आहे, जिज्ञासूंनीं ऐकावे. मूळ गाण्यावर आधारित आहे असे म्हटले तरीही संगीतकार म्हणून शांतनू मोईत्रा यांनी स्वतःचे योगदान निश्चितच दिलेले आहे. बंगाली गाण्याचा मुखडा साम्य दर्शवतो परंतु पुढील स्वररचना मात्र *स्वतंत्र* आहे तसेच वाद्यमेळ संपूर्ण वेगळा आहे. गाण्याची चाल *जयजयवंती* रागावर आधारलेली आहे. रागाचे स्वरूप बघता, *निसारेगमप* हे आरोही तर *सानि(को)धपमगरेग(को)रेसा* हे अवरोही स्वर मिळतात. अर्थात या स्वरांशी गाण्याच्या स्वररचनेचा ताळमेळ बघता, *पियू /बोले / पिया बोले/ जानू /ना* *सा नि(को)/सारे / रेग मग /सानि(को)/सा* आता जरा बारकाईने ऐकल्यास, *कोमल निषाद* स्वराचे प्राबल्य ऐकायला मिळते. *जिया डोले, होलै होलै, क्या ये डोले जानू ना* ही ओळ देखील वरील स्वरावलीत बांधलेली आढळते आणि म्हणूनच पुनरुक्ती टाळली. खरतर गाण्याचा सुरवातीला जे *humming* आहे, तिथेच रागाची ओळख पटते. अर्थात पुढे मात्र रागाला बाजूला सारले आहे. नवसर्जकता ही ललित संगीतात अशा प्रकारे आढळते. सुरवातीला पियानो वाद्याचे स्वर ऐकायला मिळतात आणि तिथे पाश्चात्य कॉर्ड्स धर्तीची रचना ऐकायला मिळते. एकप्रकारचे *फ्युजन* म्हणता येईल. दुसरा मुद्दा ध्यानात घेतल्यास, गाण्यावर *रवींद्र संगीताची* दाट छाया पसरलेली आहे आणि याचे कारण बहुदा गाण्याच्या मूळ चालीत दडलेले आहे. गाण्याच्या वाद्यमेळात आधुनिकता दिसते तसेच एके ठिकाणी क्षणमात्र पाश्चात्य बॉल डान्सचे स्वर सुंदररीत्या मिसळले आहे. ही संगीतकाराची आधुनिक दृष्टी म्हणता येईल. स्वररचना म्हणुन स्वतंत्र विचार करायचा झाल्यास, गाणे सरळसोट चालत आहे, फारशा अनघड हरकती नाहीत तसेच अति बौद्धिक वक्रता नाही. एक शांत लय गाण्यात दरवळत आहे आणि तीच लय आपल्या मनाचा ठाव घेते वरती मी कवितेच्या संदर्भात *खटके*हा मुद्दा मांडला होता, त्याची प्रचिती गाणे ऐकताना मिळते. कुठे फारशी शाब्दिक ओढाताण नसल्याने आस्वादात कुठेही विक्षेप येत नाही. जुन्या सरंजामी वातावरणातील गाणे असल्याने, त्याचा थोडा प्रभाव जाणवतो. सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी हे गीत गायले आहे. गायन म्हणून तसे फार काही टीकात्मक लिहिता येणार नाही. गायक म्हणून सोनू निगम, यांच्या गायनात एक दोष मात्र कायम आढळतो. शब्दांचा उच्चार करताना, नेहमी शब्दांवर अनावश्यक जोर देतो किंवा शब्दांचा *थ्रो* करताना किंचित ओठ दाबून करतो, या शंकेला वाव आहे. श्रेया घोषाल मात्र अप्रतिम. स्वरिक खटके, छोट्या हरकती, या मधून गायिकेच्या अभ्यासाची जाणीव होते. ललित संगीत हे नेहमीच शब्दप्रधान असल्याने, शब्दांचा स्वरांतून उच्चार करताना, शंकाचे औचित्य सांभाळणे अगत्याचे असते आणि इथे श्रेया घोषाल बाजी मारून जाते. जरी मी वरती सोनू निगम यांच्या गायनातील एक ठळक मुद्दा मांडला तरी देखील स्वरांतील सुरेलपणा निश्चितच वाखाणण्यासारखा असतो. त्यामुळे हे युगुलगीत अतिशय श्राव्य झाले आहे. हल्लीच्या एकूणच गदारोळात, त्यामुळे हे गाणे ऐकणे, ही सांगीतिक मेजवानी ठरते. पियु बोले, पिया बोले, क्या बोले जानू ना जिया डोले, होलै होलै, क्या ये डोले जानू ना. दिल की जो बांते, बांते जो दिल की है, दिल में ही रखना पियु बोले, पिया बोले, क्या बोले जानू ना जिया डोले, होलै होलै, क्या ये डोले जानू ना.या लब तो ना खोलूँ मैं, खोलूँ ना लब तो पर आँखों से सब कह दिया पियू बोले,पिया बोले, क्या बोले जानू ना जिया डोले, होलै होलै, क्या ये डोले जानू ना.या एक नदी से मैंने पूछा इठलाके चल दी कहाँ दूर तेरे पी का घर है, बलखाके चल दी कहाँ थोड़ा वो घबराई, थोड़ा सा शरमाई, उछली यहाँ से वहाँ सागर से मिलने का उसका तो सपना था, मेरी ही तरह पिया जिया डोले, होलै होलै, क्या ये डोले जानू ना.या पियू बोले,पिया बोले, क्या बोले जानू ना मैंने पूछा एक घटा से, इतराके चल दी कहाँ प्यास के भरी जमीं हैं, बरसो भी, तरसाओ ना थोड़ा वो गुर्राई, थोड़ा सा थर्राई, गरजी यहाँ फिर वहाँ प्रीत लुटाती फिर वो झमझमझम बरसी वो, तेरी ही तरह पिया पियू बोले,पिया बोले, क्या बोले जानू ना जिया डोले, होलै होलै, क्या ये डोले जानू ना.या Piyu Bole | Parineeta | Saif Ali Khan & Vidya Balan | Sonu Nigam & Shreya Ghoshal (youtube.com)

Saturday 17 February 2024

कोई हमदम ना रहा

Whitney Houston, Celine Deon किंवा Michael Jackson, हे तिन्ही गायक (इथे उदाहरणादाखल ही नावे घेतली आहेत) संपूर्ण जगात प्रचंड लोकप्रियता मिळवून होते. अर्थात लोकप्रियतेच्या संदर्भात, त्यांच्या मुलाखती प्रसारित झाल्या. मुलाखतीत एक बाब ध्यानात आली. या कलाकारांना एकदाही, तुम्ही *सिंफनी संगीत* किंवा *जाझ संगीत* शिकला होतात का? हा प्रश्न विचारला गेला नाही. पाश्चात्य कलाविश्वात, प्रत्येक कलाप्रकारांचे एक विविक्षीत विश्व असते आणि त्याच्या परिघातातच त्या कलाकाराचे विश्लेषण केले जाते. भारतात मात्र *गायक* म्हटला की त्याचे विश्लेषण रागदारी संगीताच्या संदर्भात जाणूनबुजून किंवा आडमार्गाने केले जाते आणि जर का संगीताची तालीम नसेल तर काहीसे ऊणेपण दर्शविले जाते. गायकाला रागदारी संगीताची चांगली समज असणे, हा निकष मानला गेला आहे आणि या निकषांमुळे, काही कलाकारांची वैशिष्ट्ये सांगताना, *कलाकाराने शास्त्रीय संगीताची तालीम घेतली नव्हती* अशा धर्तीवर विधाने केली जातात. गायकाने तालीम घेतली असेल तर उत्तमच पण जर का नसेल, तर टीका जरूरीची आहे का? हा विचार करणे आवश्यक आहे. आपले आजचे गाणे विचारात घेताना, वरील प्रश्न नक्कीच उद्भवतो. *झुमरू* चित्रपटातील *कोई हृदय ना रहा* या गाण्याचे गायनच नव्हे तर संगीतरचना देखील किशोरकुमारची आहे. किशोरकुमार प्रशिक्षीत कलाकार नव्हता पण एकूणच सर्वांगाने विचार करता, त्याच्या निर्मितीत कुठेही उणेपणा नव्हता. सुप्रसिद्ध ऊर्दू कवी मजरूह यांनी गाणे लिहिले आहे. गाण्यात कविता न आणता, कविता म्हणून वेगळी दखल घ्यावी, इतकी असामान्य कामगिरी त्यांनी आयुष्यभर केली. मजरूह यांनी आपली शायरी आणि चित्रपटगीते, यामध्ये फरक केला होता पण असे करताना, आवश्यक इतका दर्जा कायम राखले. हे सहज जमण्यासारखे नाही. आपल्या प्रतिभेचा आत्मविश्वास असावा लागतो. *कोई हमदम ना रहा, कोई सहारा ना रहा* या पहिल्याच ओळीत, गाण्याची पार्श्वभूमी लक्षात येते आणि पहिल्याच अंत-यातील *शाम तनहाई की है, आएगी मंज़िल कैसे* इथे पुढील कवितेचा विस्तार कशाप्रकारे होणार आहे, याची चुणूक मिळते. कवितेत काही ऊर्दू शब्द आहेत पण आकळायला कुठेही अडचण येत नाही. चित्रपटगीतासाठी कशा प्रकारची शब्दरचना असावी, याचा मजरूह यांनी आदर्श निर्माण केला. आता संगीतरचनेकडे वळूया. गाण्याची थोडी तांत्रिक घ्य्याची झाल्यास, *झिंझोटी* रागाच्या काही ठळक खुणा, रचनेत आढळतात. अर्थात जर का बारकाईने ऐकल्यास रागदर्शन घडते. आता झिंझोटी रागात आरोहात *नि वर्ज्य* तर अवरोही सप्तकात *नि कोमल* तसेच बाकीचे सगळे स्वर *शुद्ध* लागतात. या गाण्याच्या संदर्भात थोडक्यात आढावा घ्यायचा झाल्यास, *कोई हमदम ना रहा, कोई सहा रा ना रहा* *रे प मगम ग रेग, सारे सा(को)ध(को)निसानि ध पसा* वर दर्शवलेली सुरावट बारकाईने बघितली तर *निषाद* स्वर प्रभाव टाकताना दिसतो आणि मग स्वररचनेचे चलन ऐकल्यावर या रागाचे अस्तित्व दिसून येते. काही वेळेस *खमाज* राग ऐकायला मिळतो आणि त्याचे कारण झिंझोटी रागावर खमाज थाटाचा असलेला प्रभाव. गाण्याचा सुरवातीचा वाद्यमेळ ऐकताना, गाण्याची प्रकृती ध्यानात येते. वाद्यमेळासहित जेंव्हा किशोरकुमार, हुंकाराच्या अनेकविध छटा दाखवतो आणि रागाचे अस्तित्व तरळते. अत्यंत शांत सुरांत स्वररचना सुरु होते. गाण्यात जवळपास पूर्णवेळ व्हायोलिन वाद्याने प्रभाव दाखवला आहे. तसे बारकाईने ऐकले तर मुखड्याचीच चाल, पुढील अंतऱ्यासाठी वापरलेली आहे. अर्थात एक बाब स्पष्टपणे मांडायला लागेल, गाण्यात खऱ्याअर्थी *गायक* किशोरकुमार, संगीतकार किशोरकुमारवर अधिक प्रभाव दाखवतो. अत्यंत संयत, सुबोध स्वररचना असून मनावर हीच भावना ठसते. गायक म्हणून किशोरकुमार निव्वळ अप्रतिम आहे. अर्थात किशोरकुमार हा मुळातला सक्षम गायक. त्यामुळे असेल पण त्याची गायकी अधिक अर्थपूर्ण दिसते. वास्तविक *यॉडलिंग* गायक म्हणून सुप्रसिद्ध असताना, अशा प्रकारची गाणी गाऊन, त्याने आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले आहे. अत्यंत सुरेल आणि दीड सप्तकापर्यंत सहज प्रवास होताना दिसतो. नैसर्गिक देणगी मिळावी तर अशी. गाण्यातील शब्दांचे औचित्य राखून, *शब्दाभोगी* गायन करण्यात केवळ आशा भोसले, यांचाच गळा समोर येतो. किशोरकुमार यांच्या गायकीबद्दल बोलताना, बरेचवेळा त्याच्या नैसर्गिक देणगीबरोबर त्याने रागदारी संगीताचे प्रशिक्षण घेतले नाही, हा मुद्दा मांडण्यात येतो परंतु त्याचे गायन ऐकताना, त्याची या गायकाला खरोखरच जरुरी होती का? हा प्रश्न वारंवार मनात येतो. निव्वळ गायक म्हणून त्याला निदान भारतीय गायकांमध्ये जवळपास येणार आवाज अजूनतरी आढळलेला नाही. शब्दोच्चाराबरोबर सुरेलपणा टिकवून ठेवणे, हे सहज जमण्यासारखे नाही. कुठेही स्वरांत *नाटकीपणा* आढळत नाही. *शाम तनहाई की है, आएगी मंज़िल कैसे* किंवा *ऐ नज़ारों ना हँसो, मिल ना सकूँगा तुमसे* या ओळीने गायक म्हणून किशोरकुमार काय ताकदीचा गायक होता, याची कल्पना येते. *शाम* या शब्दातून संध्याकाळची हताश वेळ, क्षणात डोळ्यासमोर उभी राहते. तसे च पुढील *तनहाई* हा शब्द गाताना, गायक म्हणून श्रेष्ठत्व स्पष्ट होते. त्याने रागदारी संगीताची तालीम घेतली नाही, या मुद्द्यावर आजूबाजूला असंख्य गायक ऐकायला मिळतात परंतु कुणीही त्यांच्या जवळपास देखील ठेऊ शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे बहुदा याचमुळे हे गाणे आजही चिरस्मरणीय ठरले आहे. कोई हमदम ना रहा, कोई सहारा ना रहा हम किसीके ना रहे, कोई हमारा ना रहा शाम तनहाई की है, आएगी मंज़िल कैसे जो मुझे राह दिखाए, वही तारा ना रहा ऐ नज़ारों ना हँसो, मिल ना सकूँगा तुमसे वो मेरे हो ना सके, मैं भी तुम्हारा ना रहा क्या बताऊँ मैं कहाँ, यूँ ही चला जाता हूँ जो मुझे फिर से बुला ले वो इशारा ना रहा Koi Hamdam Na Raha with lyrics | कोई हमदम ना रहा, कोई के बोल | Kishore Kumar | Jhumroo | HD Song (youtube.com)

Friday 18 August 2023

कलाकारांचे अध:पतन

इथे "कलाकार" म्हणजे केवळ कलाक्षेत्रातील कलावंत, इतकाच मर्यादित अर्थ नसून त्यात खेळ देखील अंतर्भूत केलेला आहे. कुठलाही लोकप्रिय कलावंत मुलत: सर्जनशील असतो. त्याशिवाय सशक्त निर्मिती होणे अशक्य. परंतु सर्जनशीलता ही काही कायम टिकणारी अवस्था नसते. तिचाही बहराचा आणि नंतर पतझडीचा काळ आलटूनपालटून येताच असतो. जेंचा बहराचा काळ असतो तेंव्हा अप्रतिम निर्मितीने तो रसिकांना आपल्या प्रतिभेचे आविष्कार सादर करून, आपल्या क्षमतेची प्रचिती तसेच रसिकांना भारावून टाकण्याची शक्ती दाखवत असतो. परिणामी कलेच्या अस्तित्वात असलेल्या परिघाची व्याप्ती अधिक रुंद करीत असतो. कलेची प्रगती ही अशीच होत असते. हा बहराचा काळ मात्र असतो अद्भुत आणि दिपवून टाकणारा. अर्थात यातून मिळणारी लोकप्रियता आणि तद्नुषंगाने मिळणारे आर्थिक फायदे, कलावंतांच्या अभ्युदयासाठी उपयोगी पडतात, आयुष्याची मार्गक्रमण सुखनैव होऊ शकते. कुणी कितीही नावे ठेवली तरी "सर्वे गुणा: कांचनमाश्रयंते" या उक्तीतच बरेच काही सामावलेले आहे. अर्थात याचा अतिरेक झाला की पतझड सुरु होते. कलावंत होणे ही काही सहज जमण्यासारखी प्रक्रिया नसते. शारीरिक तसेच बौद्धिक परिश्रमाची अथक मागणी सातत्याने होत असते. परंतु एकदा का तुमची कलावंत म्हणून प्रतिष्ठापना झाली की केलेल्या त्यागाचे साफल्य मिळायला लागते. हीच वेळ असते, कलावंताने "विवेकबुद्धी" आचरणात आणायची. मिळणाऱ्या लोकप्रियतेत स्वतःला झोकून दिले जाणे, सहज होते. त्यासाठी वेगळ्या परिश्रमाची आवश्यकता नसते. आपण काही लोकप्रिय उदाहरणे बघूया आणि वरील मुद्दे अधिक स्पष्ट करायचा प्रयत्न करूया. आपल्याकडील गायक/गायिका नेहमीच प्रकाशाच्या झोतात असतात. त्या झोताने, रसिक देखील भारावल्या अवस्थेत असतात. परिणामी सादर होणारी कलाकृती काय दर्जाची आहे? असले फडतूस प्रश्न अजिबात पडत नाही. कलावंताने काहीही गायले तरी त्याला "वाहवा" देणारा फार मोठा गट समाजात असतो आणि तो अशा अशक्त निर्मितीलाही भरभरून दाद देतो परिणामी कलेत भोंगळपणा शिरतो आणि अध:पतन सुरु होते. बरेचवेळा तर आपण नि:सत्व कडबा रसिकांसमोर सादर करीत आहोत, याचे भान देखील नसते. वास्तविक किशोरी आमोणकर हे नाव अतिशय तालेवार नाव आणि त्याला साजेशी अशीच त्यांची गायकी. मी स्वतः याचा पुरेपूर अनुभव घेतलेला आहे. काही वर्षांपूर्वीची घटना आहे, पार्ल्याला पहाटेची मैफिल होती, पहाटे ६ वाजता सुरु होणार होती. मी देखील गिरगावातून त्या मैफिलीला जायचे म्हणून ५ वाजताच पहाटेचे प्रातर्विधी आटोपून पार्ल्याला अक्षरश: धावत पळत पोहोचलो. मित्राने माझे तिकीट आधीच आरक्षित केले असल्याने, कुठे बसायचे,हा प्रश्नच नव्हता, गाणे सुरु होण्याआधी, मित्राला बोललो, "बाईंचे गाणे म्हणजे डर्बीचा घोडा आहे, जिंकला तर लाखो रुपये मिळतील पाण्यात पैसे पाण्यात"! मित्र हसला. त्यादिवशी असेच झाले, बाईंचे गाणे अजिबात रंगले नाही. बाई काहीशा चिडचिड्या देखील झाल्या. मध्यंतराला काहीसा निराश होऊन, चहा पिट असताना, मी थोडे टीकात्मक बोललो तर एक रसिक तावातावाने, "अरे आणि, बाई आता ८० पार झाल्यात, हे समजून घे"! हे ऐकल्यावर मी अवाक. जर का बाईंचे वय ८० पार आहे, तर वेळीच चंबूगबाळे आवरण्यात अधिक शान आहे. आज जसे बाई गायल्या, त्याने पूर्वीच्या असामान्य क्षणांवर काळिमा पसरणार. दुसरे असे, इथे रसिकांच्या मर्जीचा प्रश्नच उद्भवत नाही. मैफिलीच्या उत्तररंगात खुद्द बाईच बोलल्या, "असे गाणे तुम्हाला कोण ऐकवून दाखवेल!" ही म्हणजे अहंकाराची हद्द झाली. आपण रसिकांकडे पुरेपूर माप टाकले नाही तरी देखील आपल्या सादरीकरणाची मर्दुमकी गायची!! कलावंताचे अध:पतन हे असे स्पष्ट होते. काही वर्षांपूर्वीचा किस्सा आहे. एके ठिकाणी कुमार गंधर्वांचे गायन ठरले होते. त्यादिवशी मुंबईत जोरदार पाऊस असल्याने, कार्यक्रमस्थळी फारसे कुणी रसिकजन जमले नव्हते. परिणामी संयोजक काहीसे अवाक झाले होते. इतक्या जगन्मान्य कलाकाराच्या कार्यक्रमाला तुरळक गर्दी!! त्यांनी कुमार गंधर्वांना विचारले, "कुमारजी, कार्यक्रमाला कुणी आले नाही, तर कार्यक्रम पुढे ढकलूया का?" वास्तविक सुज्ञ प्रश्न होता पण कुमार गंधर्व उत्तरले, "अरे मी रसिकांसाठी थोडाच गातो, मी तर माझ्या समाधानासाठी गातो!" मग प्रश्न असा उद्भवतो, जर स्वतःच्या समाधानासाठी गायचे असते, तर मग जाहीर कार्यक्रम कशासाठी करायचे? देवासच्या घरात बसून, हवे तितके समाधान मिळवा. अर्थात या उत्तराला देखील रसिकांनी प्रचंड दाद दिली. आता हा प्रचंड अहंकार नव्हता का? आपणच आपली पूजा आरंभ करण्यासारखा हा प्रकार होता. हाच प्रकार पंडित जसराज यांच्या बाबतीत मी अनुभवला होता, वास्तविक हा गायक माझ्या खूप आवडीचा आणि यांच्या कितीतरी संस्मरणीय मैफिलींना हजार राहण्याचे भाग्य मला मिळाले होते परंतु वयाच्या ७५ नंतर निसर्गक्रमाने शरीर थकत चालले असताना, अत्यंत बेगुमानपणे गायला बसायचे . बरेचवेळा तर त्यांच्या शिष्यगण त्यांच्या सोबत असायचा आणि तेच गायला सुरवात करायचे आणि अधूनमधून पंडितजी सूर लावायचे!! मी पंडितजींचे गाणे ऐकायला आलो असताना, हे असले सरधोपट गाणे ऐकायला मिळाले. वास्तविक पंडितजींना कल्पना आली होती, आपला आता आवाज लागत नाही पण लोकप्रियता ही चीज अशी आहे, भल्याभल्या कलावंतांना भ्रांतचित्त करते. लोकं अजूनही आपल्याला नावावर, आपल्या मैफिलीला येतात, हा विचारच, त्यांना निवृत्त होण्यापासून परावृत्त करतो आणि ढासळलेल्या गळ्याकडे दुर्लक्ष करायला लावतो. ही खरे तर रसिकांची निव्वळ फसवणूक असते पण आपल्याकडील तथाकथित रसिक देखील, असल्या भोंगळ सादरीकरणाला दाद देतात, परिणामी कलाकार आणखी वाहवत जातो. अर्थात केवळ शास्त्रीय संगीतात(च) असे घडते असे नाही. सुगम संगीतात फार वेगळे घडत नसते. लता मंगेशकर ही नाव जगभर पसरलेले आणि भारतात तर पूजनीय ठरलेले. परंतु चित्रपट "वीर झारा" मधील गाण्यांतून बाईंचा खालावलेला आवाज स्पष्ट ऐकायला मिळतो. त्यावेळी बाईंवर टीका झाली. "बाईंच्या आवाजात १९७५ सालची गायकी दिसते नाही" असे बोलले गेले. बाईंनी तात्काळ उत्तर दिले, "Is it not absurd to compare my present voice with 1975 songs?" परंतु वेगळ्या शब्दात, बाईंना आपल्या खराब आवाजाची कल्पना आली होती तरीही गाणी गाण्याचा मोह आवरला नाही. वस्तुस्थिती अशी होती, १९७५ साली देखील, बाईंच्या आवाजातील कोवळीक, ताजगी लोप पावली होती आणि तरीही बाईंनीं पुढे ३० वर्षे आपली गायकी रसिकांच्या समोर रेटली!! यात आपण रसिकांना आपल्या दावणीला बांधून फरफटवत आहोत, याचा सुतराम विचार आढळत नाही. आणि रसिक देखील त्या आवाजावर आत्यंतिक आंधळे प्रेम करण्यात धन्यता मानतात. हाच प्रकार मोहमद रफींच्या बाबतीत घडलेला आहे.वास्तविक इथे मी लताबाई आणि रफी, ही २च नावे प्रातिनिधिक म्हणून घेणार आहे. एकतर या दोघांनी भारतीय मनावर कित्येक वर्षे राज्य केले आहे आणि आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. रफींचा मर्दानगी आवाज, ही त्यांची खासियत आणि पहिल्यापासून त्यांनी आपल्या या वैशिष्ट्याची जपणूक केलेली आहे. यातून त्यांच्या "अष्टपैलू" गायकीची प्रतिष्ठापना केली आणि रसिकांना भारावून टाकले. परंतु याच गायकीने त्यांच्या "नाट्यात्म" गायकीचा पाया घातला, हे कसे विसरता येईल. १९६० च्या सुमारास गाण्यांच्या स्वररचनेचा ढाचा बदलायला लागला आणि कदाचित स्पर्धेत टिकण्यासाठी असेल पण रफींनी आपल्या गायकीत "नाट्यात्म" शैली आणली. परिणामी गायकी अत्यंत "ढोबळ" झाली. परंतु या वस्तुस्थितीकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले. "बाबूल की दुआयें लेती जा" सारखे अत्यंत ओबडधोबड गाणे रसिकांच्या माथी मारले आणि रसिकांनी त्याचे कमालीचे कौतुक केले. तसाच प्रकार, रफींनी गायलेल्या मराठी गाण्यांबाबत म्हणता येईल. मराठी भाषेचा लहेजा तसेच आशय लक्षात न घेता गाणी रसिकांच्या डोक्यावर आपटली. आजही या मराठी गाण्याचे वारेमाप कौतुक होते आणि त्यामागे निव्वळ रफी या नावाची पूजा, इतकाच अर्थ निघतो. इतकावेळ आपण संगीत कलेबद्दल लिहिले पण भारतात अमाप लोकप्रिय असणाऱ्या क्रिकेट खेळात देखील असाच प्रकार आढळतो. १९६०/७० हे दशक भारतीय स्पिनर्स लोकांचे दशक म्हणून ओळखले जाते. ज्यांना "दरारा"म्हणावा, असे बेदी, चंद्रशेखर, प्रसन्न आणि वेंकट अशी चौकडी होती आणि एकहाती सामना जिंकवून देण्याची ताकद होती. पुढे ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडीज संघांची "वेगवान चौकडी" जशी प्रतिस्पर्धी संघावर दहशत ठेऊन असायची तसाच या चौकडीचा वावर होता. अगदी व्हिव रिचर्ड्स सारखा असामान्य फलंदाज शेवटपर्यत चंद्रशेखरच्या गोलंदाजी बद्दल अनभिज्ञ होता आणि त्याने ते प्रांजळपणे मान्य केले आहे. परंतु निसर्गक्रम कुणालाही चुकत नाही आणि हळूहळू वाढते वय, त्यांच्या जादूवर परिणाम करायला लागले होते. तरीही त्यांनी रेटून आपली गोलंदाजी सुरु ठेवली होती. अखेरीस १९७७ साली झालेल्या भारत/पाकिस्तान मालिकेत, त्यांच्या गोलंदाजीची पिसे निघाली आणि अत्यंत मानहानीकारक अवस्थेत त्यांनी खेळाचा निरोप घ्यावा लागला. असाच प्रकार अनेक फलंदाजांच्या बाबतीत घडलेला आहे. आपल्या शारीरिक हालचाली पूर्वीसारख्या होत नाहीत, ही जाणीव जर का त्या फलंदाजालाच होत नसेल तर आणखील कुणाला होणार? आपल्यासारखे बाहेरून बघणारे देखील म्हणतात, आता हा फलंदाज थकला आहे. असे असून देखील निवृत्ती लांबणीवर टाकतात, त्यामागे प्रचंड आर्थिक फायदा आणि लोकप्रियता न सोडण्याचा हव्यास, इतकेच कारण संभवते. अगदी सचिन पासून असंख्य खेळाडू या सापळ्यात अडकले आहेत. परिणामी निर्माण झालेली प्रतिमा भंग पावणे, हेच त्यांच्या नशिबात उरलेले असते. आता प्रश्न इतकाच उरतो, आपण लोकप्रियतेच्या आहारी न जात तटस्थपणे लोकप्रियता स्वीकारावी, हे अशक्य आहे का? अर्थात या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही कारण या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत आणि मुख्य म्हणून नेमके कधी थांबायचे, याचे अचूक भान हवे. सुनील गावस्करसारखा एखादाच कलाकार असतो, त्याला याचे नेमके भान होते आणि म्हणून आजही त्याची निवृत्ती चटका लावते.

Sunday 13 August 2023

नॅशनल क्रुगर पार्क - भाग २

खरंतर संपूर्ण क्रुगर पार्क बघायचे असेल तर हाताशी निवांतपणा मनाचा निग्रह असणे जरुरीचे आहे. आम्ही सगळे नोकरी करणारे मित्र, तेंव्हा वार्षिक सुटीच्या हिशेबात आनंद घेणार. पहिल्या रात्री सुदैवाने आम्हाला लांबून का होईना "हिप्पो" सारखे अजस्त्र जनावर बघायला मिळाले. अर्थात जवळ कोण जाणार म्हणा? रात्री उशिराने हॉटेलमध्ये परतल्याने, सकाळी लवकर उठायचा प्रश्नच नव्हता. उठल्यानंतर ब्रेकफास्ट म्हणून टिपिकल पाश्चात्य डिशेस मिळाल्या. अर्थात एव्हाना अशा पदार्थांची सवय झाली होती तरी "कोल्ड मीट" खाण्याचे धाडस शेवटपर्यंत झाले नाही!! इथले लोकं अत्यंत आनंदाने आणि चवीने खातात. वास्तविक त्याला चव अशी फारशी नसते. मी १,२ वेळा खाण्याचा प्रयत्न केला होता पण घशाखाली अक्षरश: घास ढकलावा लागला! त्यामुळे आम्लेट पाव तसेच वेगवेगळी सॅलड्स, हाच आमच्यासारख्यांचा नाश्ता असायचा. हॉटेल पारंपरिक गोऱ्या लोकांसाठीचे (एकेकाळी तसेच होते) असल्याने आणि आजही तिथल्या मेन्यूत फारसा बदल नसल्याने, निवडीला फारसा वाव नव्हता. क्रुगर पार्कमध्ये जनावरांचे अरण्य वगळता, फारसे काही बघण्यासारखे नाही आणि दिवसाउजेडी जनावरे देखील आपल्या घरात विश्रांती घेत असतात. त्यामुळे आता अंगावर आलेल्या दिवसाचे काय करायचे? हा प्रश्नच पडला होता परंतु तिथल्या एका वेटरने, तिथे जनावरांच्या छायाचित्रांचे म्युझियम असल्याचे सांगतले अनिअमचा मोर्चा तिकडे वळवला. बऱ्याच व्हिजिटर्सनी, त्यांनी बघितलेल्या जनावरांचे नैसर्गिक अवस्थेतले फोटो ठेवले होते. अर्थात जनावरांचा देखणा जिवंतपणा फोटोमध्ये पकडणे तसे अवघडच असते म्हणा. सर्पांचे फोटो मात्र दिसले नाहीत. परंतु सिंह, वाघ,चित्ते, बिबळे यांचे फोटो बघायला मिळाले. अर्थात म्युझियम झाले तरी किती वेळ घालवणार!! शेवटी पुन्हा जनावरांच्या राज्यात हिंडायचे ठरवले आणि गाडी तिकडे वळवली. फार अपेक्षा नव्हती, त्यामुळे आरामात गाडी चालवत असताना, एकेठिकाणी माणसांचे घोळका दिसला. कसली गर्दी म्हणून गाडी जवळ नेली तर तिथे अवाढव्य आकाराचे सिंह विश्रांती घेत जमिनीवर पहुडला होता. त्याचे आकारमान स्पष्ट दिसत होते तसेच त्याची नजर देखील बघता येत होती. इतका राजस आणि राजबिंडा दिसत होता की डोळ्यांना भुरळ पडली. आमच्यापासून जवळपास ३०० ते ४०० मीटर्सवर तरी नक्कीच होता. आम्ही तर सोडाच तिथल्या तथाकथित धैर्यवान गोऱ्या लोकांचे देखील, सिंहाच्या जवळ जाऊन, बघण्याचे धैर्य झाले नव्हते. एक इच्छा अपुरी राहिली, सिंहाची गगनभेदी डरकाळी ऐकायला मिळाली नाही. असो, दुधाची तहान ताकावर का होईना पण भागवता आली. त्याची विख्यात आयाळ, पंजा आणि समजा तोंडात भक्ष पकडले तर सुटका होण्याची शक्यता निव्वळ अशक्य, हेच समजून घेतले. जवळपास अर्धा तास तरी त्याच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघून घेतले. इथे प्रथमच एक सूचना स्पष्टपणे लिहिलेली असते, जनावरांना खायला काहीही देऊ नये आणि जर का दिलेत आणि अनावस्था प्रसंग ओढवला तर क्रुगर पार्क अजिबात जबाबदार नाही. आता इतके स्पष्ट लिहिल्यावर कुणीही काहीही खायला देण्याच्या फंदात पडत नव्हते. जरा वेळाने गाडी घोळक्यातून बाहेर काढली आणि इतरत्र फिरायला सुरवात केली. अर्थात इथे झेब्रे, हरणे प्रचंड प्रमाणात आढळतात आणि सगळे घोळक्याने एकत्र राहतात. कालच मन:पूत ही जनावरे बघितल्याने, आज परत तिचे जनावरे बघण्यात फारसा रस नव्हता. अर्थात धावणारे हरीण बघायला मात्र अतिशय देखणे असते. पुढे अशीच गाडी दामटत असताना, कालच्या हिशेबात आज, अचानक जरा जवळून धिप्पाड हत्तीचा कळप, आपल्या मस्तीत डौलदार चालीत हिंडताना बघायला मिळाला. या जनावराबाबत आम्हाला हॉटेलमध्येच सूचना मिळाली होती, त्यांना डिवचू किंवा चुचकारु नका, जर का हत्ती डिवचला गेला तर मात्र धडगत नसते. अर्थात इतके धिप्पाड जनावर, बघता क्षणीच छातीत धडकी भरते. एक वैशिष्ट्य मात्र बघता आले. कळपातील छोटे हत्ती हे नेहमी कळपाच्या आत असतात आणि त्यांना कळपातील मोठे हत्ती संरक्षण देत असतात. खरतर हरणे देखील वेगवेगळ्या रंगाची होती आणि आमचे तथाकथित ज्ञान इतकेच सीमित होते!! एव्हाना उन्हाची तलखी भाजायला लागली असल्याने, हॉटेलमधील गारवा अधिक सुखाचा, असे मानून हॉटेलमध्ये परतलो. अर्थात अशा उकाड्यात अति थंड बियर हा उतारा भलताच सुखाचा वाटला. संध्याकाळपर्यंत हॉटेलच्या पोर्चमध्ये बसून आत येणारे देखणे सौंदर्य न्याहाळणे, हाच उद्योग उरला होता. त्या रात्री २५ डिसेम्बरची पार्टी होती, आम्हाला जरा उशिरानेच समजले. अर्थात पार्टीचे देय होते. ते देणे चुकवले आणि रात्रीची वाट बघायला लागलो. गोऱ्या मुली वागायला सढळ असल्या तरी अंतर राखून वागत असतात. परिणामी त्यांच्या जवळ फारसे जाता येत नाही. अर्थात ओळख झाल्यावर प्रश्नच उद्भवत नाही. इथे तर सगळेच नवीन, म्हणजे कुणाची ओळख निघणे दुरापास्त. असे असले तरी आम्ही पार्टी एन्जॉय केली, कारण तिथे असलेला अवाढव्य केक आणि कॉकटेल्स!! शेवटी ११च्या सुमारास, बरेचजण पुन्हा अरण्यात जायला निघाले तशी आम्ही मित्रांनी पाय काढता घेतला. जनावरांच्या राज्यात जमेल तितके वावरायचे, हेच ध्येय ठेऊन, आम्ही इथे आलो होतो आणि तिसरी रात्र उंडारायला बाहेर पडलो. यावेळेस जरा वेगळा रस्ता पकडला आणि वातावरणातील बदल किंचित जाणवला,निदान आम्हा सगळ्यांना तरी त्यावेळी तसे भासले. कारण यावेळेस अनेक जिराफांच्या टोळ्या हिंडताना दिसल्या. जिराफ आम्ही कधीही जवळून बघितला नव्हता आणि त्यांच्या उंचीने आम्हा सगळयांची नजर दिपून गेली. वास्तविक जिराफ प्राणी शाकाहारी - शक्यतो झाडांची पाने, गवत इत्यादी त्यांचे अन्नतरी एकूणच अचाट उंची उगीचच माणसाला त्यांच्यापासून दूर ठेवते. एक बाब लक्षात आली, हे सगळे प्राणी सतत कळपात राहतात, संरक्षणाची सिद्धता म्हणून असेल. तसेच रात्रीच्या वेळी त्यांचे डोळे फारच चमकदार दिसतात. पार्कमध्ये जागोजागी तलाव तसेच पाणथळे बांधलेली आहेत जेणेकरून, विशेषतः रात्रीच्या वेळी जनावरांना तहाण भागवणे सहजप्राप्य होईल. अशाच एका तलावात, त्या रात्री अवाढव्य मगर बघितली. पाण्यामधील तिचे साम्राज्य कधीही उध्वस्त न होणारे परंतु पाण्याबाहेर मात्र मगर बरीचशी असहाय होते. जवळपास ४,५ फुटी लांब होती. काळीकभीन्न मगर पाण्यात असताना, अति हिंस्र असते. आमचे एक दुर्दैव, शिकार करतानाचे जनावर बघायला मिळाले नाही तसेच केलेल्या शिकारीचा फडशा पाडणारे जनावर बघायला मिळाले नाही. काही जणांना मिळाले असेलही पण त्यासाठी मोठा मुक्काम करणे गरजेचे असावे. दुसऱ्या दिवशी परतायचे असल्याने, झाले त्या दर्शनावर समाधान मानून हॉटेलचा रस्ता पकडला आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता करून घराच्या वाटेवर निघालो.

Friday 21 July 2023

मिडोज हाऊस

वास्तविक आता त्या इमारतीचे नाव "गणेश स्मृती" आहे परंतु मी जन्माला आलो, तेंव्हा त्याचे नाव मिडोज हाऊस असे होते. इथे जवळपास सलग १० वर्षे तरी नक्कीच काढली. माझ्या आई वडिलांनी अर्थात त्यापेक्षा अधिक काळ व्यतीत केला. खरतर, अचानक हा विषय डोक्यात आला आणि बऱ्याच आठवणी डोक्यात घुसळायला लागल्या. अर्थात जन्माला आल्यापासूनची पहिला ३,४ वर्षे तरी काहीच लक्षात रहात नाही म्हणा. परंतु मी जसा चिकित्सक शाळेत - त्यावेळी मॉंटेसरी होती, जायला लागलो आणि बाहेरचे जाग आणि हे घरातले जग, अशा स्वतंत्र आठवणी मनात राहिल्या, हे नक्की. आता आठवते, माझ्या आजूबाजूला तेंव्हा इतर जी कुटुंबे होती, ती जवळपास सगळी पारशी होती आणि सुरवातीला तरी माझे मित्र पारशी होते. अर्थात बाजूच्या हेमराजवाडीतील मराठी मित्र त्यावेळी होतेच. अजूनही ही पारशी कुटुंबे आठवणीत राहिली आहेत. आमच्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर माझ्याच वयाचा असावा पण गोरागोमटा "बर्जेस"' नावाचा मुलगा राहात असे. तसे बव्हंशी पारशी लोकं गोऱ्या वर्णाचे. या बर्जेसला एक धाकटा भाऊ असल्याचे अंधुकसे स्मरणात आहे. वास्तविक आता वाडीत औषधाला देखील पारशी राहात नाहीत पण तेंव्हा आमच्या करेलवाडीत ५०% पारशी तर ५०% महाराष्ट्रीयन राहात होते. मी वर म्हटल्याप्रमाणे, माझ्या आजूबाजूला तर सगळी पारशी कुटुंबे होती. आमच्या वाडीच्या टोकाला ४ मजली इमारतीच्या शेवटच्या मजल्यावरील "'यझदी"' नावाचा माझ्याच वयाचा मुलगा रहात होता. बरेच वर्षे तो आणी मी मित्र म्हणून एकत्र भेटत होतो आणि माझ्या त्याच्याशी गप्पा व्हायच्या. त्याच्याकडून पारशी समाजाशी माझी जवळीक झाली. आमच्या बिल्डिंगच्या बाजूच्या इमारतीत २ऱ्या मजल्यावर "जेम्स आणि त्याची बायको ''केटी" आपल्या मुलाबाळांसह रहायचे. ही केटी दिसायला भलतीच देखणी आणि आमच्या मित्रांची "'क्रश"' होती.आम्ही सगळे मराठी मित्र जवळपास एकाच वयाचे, फारतर १,२ वर्षांचा फरक. आम्ही सगळे वागायला ""टगे"' असेच होतो. महा व्रात्य, जरा म्हणून स्वस्थ बसणे स्वभावातच नव्हते. त्यातून ही केटी म्हणजे आमच्या वाडीचे सौंदर्य स्थान!! केसांचा डौलदार बॉब केलेला (माझ्या लहानपणी बाईने केसांचा "बॉब" करणे म्हणजे फॅशनची परमावधी!) गोरापान वर्ण, ओठांवर बहुतेकवेळा लालचुटुक लिपस्टिक लावलेली, अंगात बऱ्याचवेळा मिडी अथवा मॅक्सि घातलेली, बाहेर पडताना, अंगावर सुगंधी स्प्रे मारलेला(त्याकाळी स्प्रे वगैरे चैनीच्या गोष्टी आम्हा मित्रांच्या खिजगणतीत देखील नव्हत्या) आणि ती ठुमकतच वाडीतून बाहेर पडायची. ती घरातून बाहेर पडल्याचे, मला आणि माझ्या मित्रांना (त्यावेळी माझे मित्र आमच्याच घरी बरेचवेळा असायचे कारण तळमजल्यावरील घर) दिसली की आमची ""गॅंग"" जरा अंतर राखून तिचा पाठलाग (तिला कसे कळणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन) करत असू. तिच्या आरस्पानी सौंदर्याचा,आमच्या डोळ्यांनी "'आस्वाद" घेत असू. अतिशय प्रमाणबद्ध बांधा,किंचित निळसर डोळे आणि एकूणच चालीतून ओसंडून जाणारा आत्मविश्वास, या सगळ्याचे आम्हा शाळकरी मुलांना कमालीचे आकर्षण होते. आता ती आमची वाडी सोडूनच जवळपास ४० वर्षे झाली आणि आता समोर आली तर ओळख पटेल का? कारण आता आम्ही सगळेच साठी पार म्हणजे केटी कमीतकमी सत्तरीपार असणारच. आता तिचे देखणेपण लयाला नक्कीच गेले असणार. तेंव्हा जरी ओळख झाली/पातळी तरी ते आकर्षण नक्कीच नसणार. ती तेंव्हा "विप्रो" कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टरची सेक्रेटरी म्हणून नोकरीला होती. त्याकाळी काय किंवा आजही, घरातले पाणी भरायला मिळण्याची वेळ म्हणजे पहाटे ५ वाजता नळाला पाणी येणार आणि फक्त ६ ते फारतर ६.१५ पर्यंत पाणी भरायला मिळणार. आजही यात काही फरक नाही. आम्ही तळमजल्याला रहात असल्याने पहिल्यांदा आम्हाला पाणी मिळायचे. तेंव्हा घरात त्याकाळच्या तथाकथित बाथरूम - मोरीच्या बाजूला माझ्या वडिलांनी मोठे पिंप ठेवले होते, पिंपात पाण्याचा पाईप सोडून पिंप भरायचे, नंतर घरासाठी पिण्याचे पाणी भरायचे. हा पहाटेचा कार्यक्रम कितीतरी वर्षे नाना एकट्याने करत होते. जिथे माझेच वय ५,६ इतपतच तेंव्हा मी कसली बोडक्याची मदत करणार! मी पुढे होऊन मदत करावी,असे कधी सुचल्याचे देखील आठवत नाही. मोरीच्या बाजूच्या आमचे छोटेसे स्वयंपाकघर आणि तिथे पहाटेपासून आईची वर्दळ सुरु असायची कारण, स्वयंपाक करून तिला नोकरीची वेळ गाठायची निकड होती. आई १९७४ पर्यंत, क्रॉफर्ड मार्केट जवळील पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये नोकरी करीत होती. कधीकधी, आमच्याकडे काका, मावशी, मामा आणि त्यांची मुले रहायला यायची. ती आली म्हणजे मग घरात जास्तीचे पाणी भरून ठेवायला लागायचे. परिणामी आम्हाला पाणी भरायला वेळ लागायचा. जरा जास्तीचा वेळ लागला कि वरच्या मजल्यांवरून पारशांचा आवाज यायचा - ए तल माला, नल बंद करो!!. पहाटे पहाटे थोडा वेळ तरी नक्कीच ही आरडाओरड चालायची. आता समजते, त्यांची तरी काय चूक म्हणा, पाणी फक्त १. ३० तास मिळणार आणि आमचे झाल्यावर मग पहिला, नंतर दुसरा, नंतर तिसरा आणि मग शेवटी चौथा मजला यांना पाणी भरायची संधी मिळणार. यावरून अधूनमधून आमच्याशी भांडणे व्हायची. अगदी बर्जेसचे आई/वडील आमच्या दाराशी भांडायला यायचे.मग नाना आणि आई विरुद्ध ते दोघे, अशी शाब्दिक चकमक व्हायची. पारशी "गरम" होताना,असे दुर्मिळ दर्शन व्हायचे. अन्यथा पारशी जमात अतिशय थंड डोक्याची आणि कधीही कुणाच्या आयुष्यात डोकावून बघणार नाही. आपण बरे आणि आपले आयुष्य बरे, असाच एकूण खाक्या. दुसरी भांडणाची वेळ म्हणजे, बरेचवेळा वरील मजल्यावरील पारशी, माशांचे धुतलेले पाणी, खालच्या गटारात टाकायचे. इमारतीचे गटार इमारतीला लगटूनच आहे. त्यामुळे मग त्या पाण्याचे काही थेंब आमच्या स्वयंपाकघरात पडायचे. मग आई खवळायची आणि मग पुन्हा शाब्दिक चकमक जुंपायची. असे असले तरी कुणाच्याही सणासुदीला खास डिशेस घरी केल्या असल्या की मोकळ्या मनाने आदानप्रदान व्हायचे. आजही पारशांचा शेवयांचा गोड शिरा, अगदी चारोळी तसेच काजू वगैरेची पखरण केलेला शिरा घरात आला म्हणजे आम्हा भावांचा गोविंदा!! त्याकाळी पदार्थात, "ड्रायफ्रूट्स" टाकून तो पदार्थ अधिक स्वादिष्ट करायचा, ही चैनीची परमावधी असायची. माझी आई देखील दिवाळीचे घरगुती पदार्थ त्यांच्याकडे मी किंवा माझ्या भावांकरवी पाठवत असे. त्यानिमित्ताने केटीच्या घरी जायची संधी मिळायची!! का कुणास ठाऊक, मी तरी तिच्या घरी मोकळ्या मनाने गेलो नाही, सारखे छातीत धडधडायचे. केटी कशी बोलेल,कशी वागेल इत्यादींचा मनाशी खेळ चालायचा. प्रत्यक्षात काहीही कधी घडले नाही, माझ्याच मनाचा नाचरेपणा. दुसरे निरीक्षण म्हणजे आमच्या बिल्डिंग मध्येच नव्हे तर इतर बिल्डिंग मधील पारशी अत्यंत टिपटॉप रहात असत, कपडे कधीही गबाळे, विना इस्त्री केलेले अजिबात नसायचे. अगदी ४,५ वर्षाचा मुलगा असला तरी. ही पारशी जमात कधीही वाडीतल्या लोकांच्यात फारशी मिसळली नाही. सतत आपण निर्माण केलेल्या कोषात रहात असत. कधी रस्त्यात भेटले तरी जेव्हड्यास तेव्हडे बोलायचे, अर्थात काही काम असेल तर अन्यथा ओठावरील स्मित, त्यांना पुरेसे असायचे. दुसरे म्हणजे बहुतेक सगळे पारशी अतिशय मोठ्या म्हणजे "टाटा", "गोदरेज" "वाडिया'' असल्या फाउंटन भागातल्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी जात असत. पारशी म्युनिसिपालिटी किंवा सरकारी ऑफिसमध्ये काम करत असल्याचे दृश्य फारच दुर्मिळ असायचे. अगदी बँक म्हटली तरी परदेशी बँकेत नोकरी करायचे. परिणामी त्यांच्या वागण्या,बोलण्यात एक प्रकारचा "पॉलिशनेस"' असायचा. आम्हा मित्रांना त्याचे देखील नवल वाटायचे. त्याकाळी आम्हाला इस्त्रीचे कपडे घालायला मिळणे, ते बव्हंशी सणासुदीला किंवा कुणाकडे भेटायला जायचे असेल तरच मिळायचे. बहुतेक पारशांकडे स्कुटर असायची गाड्यांचे दिवस फार उशिराने आले. पहाटे हवेत कितीही गारवा असला तरी, पारशी पाण्याची बालदी घेणार आणि आपली स्कुटर धुणार!! हा सोहळा जवळपास तासभर चालायचा. इतक्या निगुतीने स्कुटरची काळजी घेणारे नंतरही फारसे पाहण्यात आले नाही. आमच्या इमारतीच्या बाजूच्या इमारतीत,तळ मजल्यालाच एक म्हातारी पारशी एकटीच रहायची. नवरा बहुदा पूर्वीच निर्वतला असावा. तिच्या मुलीचे लग्न होऊन, ती सासरी गेलेली. त्यामुळे असेल पण तिचे आमच्या कुटुंबावर, विशेषतः आईवर फार प्रेम होते. तिच्या घराच्या बाजूला बुजलेली विहीर होती. बुजलेली कारण तिचे झाकण उघडल्याचे स्मरत नाही आणि पारशांच्या दृष्टीने विहीर म्हणजे त्यांचा देव. दर संध्याकाळी ही म्हातारी, विहिरीला चक्क आंघोळ घालायची, मग विहीर पुसायची. त्यानंतर रांगोळी (रांगोळीचे भोके असलेले भांडे असायचे, त्यातून छापा मारावा तशी रांगोळी तयार होत असे) रांगोळी काढून झाली कि मग त्याच्यावर फुलांची चादर चढवली जायची आणि शेवटी एका पाण्याच्या ग्लासमध्ये तरंगता दिव्याची ज्योत पेटवली जायची. हा पूजा सोहळा जवळपास तासभर चालायचा. तेंव्हा जरावेळाने आम्ही व्रात्यपणे ते दिवे फुंकर मारून विझवत तरी असू किंवा उडी मारून घरी जात असू कारण बाजूच्या हेमराज वाडीत जायचे म्हणजे एकतर बाजूच्या गटाराच्या भिंतीवर चढून जायचे किंवा या विहिरीवरून उडी मारून जायचे. त्यावेळी पायाने फुले कुस्करून जाण्यात एक विचीत्र आनंद मिळवत असू. कधीतरी मग त्या पारशी म्हातारीला आमचा खोडकरपणा कळायचा. मग तिचे वाक्ताडन सुरु व्हायचे. अर्थात तिच्या बोलण्याकडे कसे दुर्लक्ष करायचे, हे माहीत होते. इतके असूनही आम्हा भावांवर तिचे निरपेक्ष प्रेम होते. तिच्या घरात नेहमी २ कुत्रे असायचे त्यामुळे आम्ही तिच्या घरी फार वेळा गेल्याचे आठवत नाही. असाच एक पारशी कायमचा स्मरणात राहिला. "मिनू" त्याचे नाव. ठाकूरद्वारच्या चौकात त्याचे "सनशाईन" नावाचे इराणी हॉटेल होते.(आता भूतकाळ वापरायला हवा कारण आता redevelopment मध्ये ती सगळी इमारत पडली) आणि हा त्याच्या गल्ल्यावर बसलेला असायचा. अवाढव्य दणकट शरीरयष्टी, अत्यंत भेदक निळे,घारे डोळे, बहुतेकवेळा हाफ शर्ट अंगात घातलेला. प्रथमक्षणी बघायला भीतीच वाटायची. पण मनाने अत्यंत मवाळ आणि मनमिळाऊ होता. मोडके तोकडे मराठी बोलत असे पण प्राय: पारशी (मिश्र गुजराती भाषा) बोलत असे. आता हॉटेलचा गल्ल्यावर बसायचा म्हटल्यावर तोंडाची टकळी सतत चालू असायची आणि अर्थात तोंडातून मंत्रपुष्पांजली प्रमाणे शिव्यांचा उच्चार व्हायचा. आजूबाजूला स्त्रिया आहेत, हे बघून देखील तोंड आवरून बोलायचे, हा संकेत यथेच्छ नाकारायचा. आता चौकात हॉटेल असल्याने, गर्दी कायमची. पूर्वी तिथे बियर बार नव्हता पण नंतर आला. आम्हा मित्रांचा तिथे तळ ठोकलेला असायचा आणि आमचा घरातला वावर वगळता, बहुशः इथेच भेटत असू. प्रत्येकवेळी चहा (तेंव्हा खिशाला इतकेच परवडायचे) घेतलाच पाहिजे असले फालतू बंधन नसायचे. हॉटेलमधून रस्त्यावरील देखणे सौंदर्य न्याहाळणे, प्रसंगी आकंठ रसपान करणे, आणि त्याचे अत्यंत चविष्ट शब्दात वर्णन करणे, हा तर आमचा नेहमीचा उद्योग असायचा. अर्थात तोंडात तेंव्हा सिगारेट कायम असायची. बाहेर रस्त्यावर सिगारेट ओढण्याची प्राज्ञा नसायची. त्यामुळे हॉटेल हे नेहमीच सुरक्षित!! तसे आमचे घर ३ खोल्यांचे होते. त्यात आम्ही ३ भाऊ आणि आई,नाना राहात होतो. तेंव्हा आमच्या गरजा देखील मर्यादित होत्या. घरातच Toilet facility ही सुखाची परमावधी होती कारण आजूबाजूला चाळ संस्कृती आणि common toilet!! पुढे कधीतरी घरात डायनिंग टेबल आले तसेच मला वाटते, आजूबाजूचा परिसरात कुठेही नसलेला आणि आमच्या घरी असलेला असा फोन आला!! डायनिंग टेबल आणि खुर्च्या!! त्या खुर्च्यांवर बसून जेवण घ्यायचे, हा ऐषाराम होता तर घरात फोन येणे म्हणजे आपले समाजातील स्थान थोडे उंचावर गेल्याची भावना झाली होती. आज हे सगळे बालिश वाटते कारण आयुष्य प्रचंड प्रमाणात बदलले. मला आठवत आहे त्याप्रमाणे नानांनी नॅशनल कंपनीचा टेप रेकॉर्डर घरी, विकत आणला तेंव्हा सगळ्या नातेवाईकांत प्रचंड औत्सुक्य पसरले होते. यंत्रात कॅसेट टाकायची आणि रेकॉर्ड बटन दाबले की बोलणे रेकॉर्ड व्हायचे. पहिल्यांदा नातेवाईकांना याची कल्पना नसायची आणि त्यामुळे बरेचसे नातेवाईक, यंत्रातून आपलाच आवाज ऐकायला येत आहे, हे बघून आश्चर्यचकित व्हायचे. कुठलाही मानवी आवाज, कधीही, केंव्हाही ऐकायला मिळायचा. त्या टेप रेकॉर्डर सह एक इंग्रजी वाद्यसंगीताची टेप मिळाली होते. त्या वयात ती टेप ऐकणे, म्हणजे फुशारकी मारायला मिळालेले एक कारण होते. पुढे मी काही पाश्चात्य संगीताच्या मैफिली परदेशी असताना ऐकल्या, तेंव्हा ही अर्थात ही आठवण नेहमी यायची. त्या काळात आमच्याकडे "नारायण" नावाचा एक नोकर कमला होता, घरातच राहायचा. घरातील चौथ्या खोलीत पारशांची विहीर असल्याने (त्या विहिरींची देखील सटीसामासी पूजा व्हायची) ती खोली वापरण्यासाठी फारच अयोग्य होती. आम्हा भावांच्या कपड्यांचे कपाट त्या खोलीत होते आणि त्याच खोलीत नारायण झोपायचा. कला चेहरा, बुटकी उंची आणि स्थूल म्हणावा अशीच शरीरयष्टी. सतत अर्धी पॅन्ट आणि हाफ शर्ट, या अवतारात असायचा. आमचे घर पूर्ण शाकाहारी तरी त्याच्या हाताला चव होती. एक आठवण, घरात लोखंडाचे भांडे होते, आता इडल्या बनवताना वापरतात तसे आणि एकदा त्याने "आप्पे" म्हणून पदार्थ केला होता. पुढे बरेच वेळा खाल्ला. त्यावेळी नवीन पदार्थाची नवलाई होती. चवीला गोड आणि चमचमीत असा होता. जेवण मात्र सुंदर बनवायचा पण कर्माने अतिशय हलका होता. बाहेरच्या जागेत नानांचा वर्कशॉप होता आणि तिथे मशीन वाईंडिंग वगैरे कामे सतत चालायची. परिणामी घरात बऱ्याचवेळा तांब्याच्या कॉइल्स असायच्या. त्या नारायण चोरायचा आणि आपल्या गादीत लपवून ठेवायचा!! नानांना संशय होता आणि एकदा नानांनी त्याला विचारले. अर्थात नारायण कडून नकारघंटा. तरी एकेरात्री नानांनी त्याला गादी दाखवायला आणि सगळं "ऐवज" बाहेर आला!! अर्थात घरात भांडण सुरु झाले, इतके की बाहेर बहुदा आवाज गेला असावा. कारण दुसऱ्या दिवशी बाजूच्या पारशांनी विचारणा केली होती. इतके होऊनही आई/नानांनी त्याला घरात सांभाळला होता कारण आम्ही तिघेही वयाने फारच लहान होतो, आईची नोकरी चालू होती. पुढे असे प्रकार वाढत गेले तशी नानांनी त्याला काढून टाकला. वाडीत तो "धैर्यवान" कुटुंबात कामाला गेला पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही त्याप्रमाणे त्या घरातही त्याने चोरी केली. मग मात्र तो वाडी सोडून गेला. आमचा काहीच संपर्क उरला नाही. या सगळ्यांच्या आधी, घरात नानांनी पाणी गरम करायचा हीटर आणला होता. धातूची वर्तुळाकार आतून पोकळ अशी नळी होत. ती पाण्यात टाकायची आणि इलेक्ट्रिक बटन ऑन करायचे! हळूहळू ती नळी तापत जायची आणि पाणी गरम व्हायचे. अर्थात पाणीपुरेसे गरम झाल्यावर स्विच बंद करायचा आणि हीटर थंड होईपर्यंत पाण्यात ठेवायचा आणि मगच काढायचा. मी एकदा भयानक अगोचरपणा केला होता. पाणी गरम झाले, स्विच ऑफ झाला होता पण हीटर थंड झाला नव्हता आणि मी हीटर बाहेर काढला. कुठेतरी हलगर्जीपणा झाला आणि त्या हीटरचा पोटाला स्पर्श झाला!! अजूनही त्यावेळी अंगातून उठलेला वेदनेचा लोळ आठवत आहे. अर्थात जिथे तप्त हीटरचा स्पर्श झाला, ती जागा पोळून सुजली होती. माझे वय बहुदा ६,७ वर्षे असावे. माझा थयथयाट तर सुरु झाला पण प्रथम आईने मला गप्प केले आणि नानांनी घरातील एक मलम की औषध लावले. थोड्या वेळाने वेदना कमी व्हायला लागल्या पण भाजलेला व्रण मात्र पुढे काही महिने अंगावर बाळगून होतो. हळूहळू आमची वये वाढत होती. घरात नवीन घर घ्यायचे विचार सुरु झाले आणि १९६९ मध्ये आमच्या समोरील एक इमारत पूर्ण दुरुस्त होत होती. त्याचा मालक, नानाच्या ओळखीचा झाला आणि त्याच्याकडून आम्हाला चौथा-शेवटचा मजला मिळाला. अर्थात हळूहळू घरातले सामान वरच्या घरात गेले आणि माझा त्या घराशी असलेला संबंध तुटला. माझी जवळपास १० वर्षे या घरात गेली होती. खरंतर आणखी देखील आठवणी असतील पण आत्ता तरी इतक्याच आठवत आहेत पण त्याने माझे बालपण ढवळून काढले, हे नक्की.

Monday 10 July 2023

स्थलांतरित नागरिकत्व

दुसऱ्या देशात स्थलांतर करणे आता जवळपास सगळ्या देशात मान्य झाले आहे. स्थलांतरीत व्यक्ती या साधारणपणे, आर्थिक,भौतिक सुख डोळ्यासमोर ठेऊन इतर(मुख्यतः प्रगत देशात) देशात जात असतात. आता प्रगत देशाचे काही प्रश्न असतात. प्रगत देशात शक्यतो मजुरी करणारे फार महाग असतात कारण तिथले कडक कायदे. स्थलांतरित व्यक्ती या, आपल्या देशातील एकूणच परिस्थिती बघून, राहणीमान, वेतन इत्यादी बाबींत, त्यामानाने "स्वस्त"उपलब्ध होतात. स्थलांतरितांना नवीन देशात, स्थायिक व्हायचे असते आणि त्यासाठी त्यांची मेहनत करायची तयारी असते. याचाच फायदा स्थानिक लोकं घेतात आणि त्यांना स्वस्तात पडून घेतात. काही उदाहरणे देतो. मी बरीच वर्षे साऊथ आफ्रिकेत काढली असल्याने, तिथल्या स्थलांतरित लोकांचे प्रश्न किती गहाण आहेत, याची कल्पना आली. इतिहासात फार मागे जायचे झाल्यास, १८५० साली, भारतातून साऊथ आफ्रिकेत, तिथल्या उसाच्या शेतात काम करण्यासाठी, प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि आताचे तामिळनाडू, इथून असंख्य मजूर कामाला नेले आणि त्यांच्याकडून वेठबिगारी कामे करवून घेतली.त्यावेळी भारताची स्थिती ब्रिटिशांनी हलाखीची केली होती, विशेषतः वर निर्देशित राज्यांची परिस्थिती तेंव्हाही हलाखीची असल्याने, तिथले मजूर, ब्रिटिशांना खूपच स्वस्तात मिळाले. डर्बन, पीटरमेरित्झबर्ग सारख्या शहरातील भारतीय लोकवस्तीचे मूळ हे इथे आढळते. अर्थात त्यावेळी आणि आजही, भारतापेक्षा तिथे परिस्थिती केंव्हाही चांगलीच आहे. असाच प्रकार ब्रिटिशांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इथे देखील केला. यात एक मेख आहे. मुख्यतः आर्थिक बाब आहे. भारतीय माणसे, स्थानिक लोकांपेक्षा स्वस्तात काम करायला तयार असतात कारण आपण भारतीय, कुठेही गेलो तरी तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याइतके लवचिक असतो. अगदी पांढरपेशे भारतीय घेतले तरी, आपली वागणूक तशीच राहते. वास्तविक ऑफिसमध्ये काम करणारे भारतीय उच्च शिक्षित तसेच प्रचंड मेहनत करणारे असतात , प्रसंगी ऑफिसवेळ संपली तरी ऑफिसमध्ये काम करायला तयार असतात पण साऊथ आफ्रिकेतील गोरे, त्याबाबत अतिशय ताठर असतात. घड्याळात संध्याकाळचे ४.३० किंवा ५.०० वाजले की लगेच ऑफिस सोडणार. आपण भारतीय प्रसंगी रात्री उशिरापर्यंत काम करीत बसणार!! त्यातून एकुणात वेतनाचा मुद्दा बघितला तर गोऱ्या माणसापेक्षा आपण भारतीय स्वस्तात नोकरी करायला तयार असतो. पुढे एकदा का "नागरिकत्व" मिळाले की मग हळूहळू आपण, आपली नखे बाहेर काढतो. परंतु तोपर्यंत कंपनीचा मालक देईल ते काम स्वीकारत असतो. प्रगत देशात कामगार कायदे अतिशय कडक असतात आणि सहसा कायद्याची पायमल्ली करायला फारसे कुणी धजावत नाही. याचा परिणाम असा झाला, साऊथ आफ्रिकेत, इतर गरीब आफ्रिकन देशातून प्रचंड प्रमाणात स्थलांतरित आले, विशेषतः नायजेरियन तर लाखोंच्या हिशेबात आले. नायजेरिया कायदा पालनाबाबतीत भयानक आहे. कायदा मोडणे, हे आपले "ब्रीद"असल्याप्रमाणे सगळे वागत असतात. अशा प्रवृत्तीची माणसे साऊथ आफ्रिकेत आली, बहुतांशी बेकायदेशीर स्थलांतरित आहे. बनावट कागदपत्रे सादर करून तर कधी काही आफ्रिकन देशातील माणसे "निर्वासित" म्हणून देशात प्रवेश करतात आणि इथल्या समाजात मिसळून जातात. याच नायजेरिन माणसांनी साऊथ आफ्रिका देश आतून पोखरला आहे, इतका की आता तर रस्त्यावर देखील "ड्रग्ज" मिळतात!! प्रसंगी हिंस्र होतात, मुडदेफराशी तर वारंवार घडणाऱ्या घटना आहेत. आता तर त्या देशाने "असुक्षितता" कायमची स्वीकारली आहे, इतकी पराकोटीची परिस्थिती झाली आहे. असेच चित्र आता बऱ्याच युरोपियन देशात दिसत आहे. स्थलांतर करताना, एक प्रश्न वारंवार भेडसावतो आणि तो म्हणजे तिथली संस्कृती किती प्रमाणात आणि कशी स्वीकारायची? अर्थात हा प्रश्न प्रामुख्याने पांढरपेशा समाजाला भेडसावतो. जे स्वीकारतात ते पुढे सुखाने राहतात पण अन्यथा फार त्रांगड अवस्था होते. हे जे इतर आफ्रिकन देशातून आले, त्यांच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवत नाही कारण त्यांना लपूनछपून राहण्याची सवय असते आणि बेकायदेशीर राहात असल्याने, घर नावाची वस्तू कधीच स्थिर नसते, कुटुंबकबिला नसतो. भणंग अवस्थेत राहण्याची तयारी असते. त्यातुन मग, कधीतरी एखादी स्थानिक मुलगी गटवायची आणि तिच्या सोबत "Contract Marriage" करून, नागरिकत्व पदरी पाडून घ्यायचे. एकदा का तुम्ही "Legal Citizen" झालात की मग उजळ माथ्याने समाजात वावरायला मोकळे!! बहुतेक देशात असेच चालू असते आणि असे घडत असल्याने अशा लोकांचा धीर चेपला जातो आणि गुन्हेगारी करायला मोकाट सुटतात. आज फ्रांस सारख्या अत्यंत प्रगत देशात हेच झाले आहे. फ्रांस देश हा तास मवाळ, सहानुभूती दर्शवणारा म्हणून ख्यातकीर्त आहे. शक्यतो दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावयाचे नाही की त्याच्या फंदात पडायचे नाही, अशी वृत्ती. अर्थात अशी वृत्ती बहुदा सर्वत्र आढळते आणि याचा फायदा बेकायदेशीर स्थलांतरित असतात, ते उठवतात. आज फ्रान्समध्ये प्रचंड जाळपोळ चालू आहे, कारणे असंख्य देता येतील, अगदी हिंसा करणारे आणि ती हिंसा भोगणारे. परंतु केवळ फ्रांस कशाला, बेल्जीयम मध्ये फार वेगळे चालू नाही. जर्मनीत मध्यंतरी सीरियामधील निर्वासितांनी असाच गोंधळ घातला होता. मागील वर्षी साऊथ आफ्रिकेत, डर्बन इथल्या प्रचंड मॉल मध्ये असाच धुडगूस घातला, कित्येकांचे प्राण गेले, भयानक नासधूस झाली.अगदी आगीचे लोळ उठले होते. पुढे चौकशी केली असता, बेकायदेशीर निर्वासितांचा हात होता, हे बाहेर आले. आता त्यांना शोधणे पण अतिशय जिकिरीचे असते. इतका अवाढव्य देश, किती आणि कुठले कानेकोपरे शोधायचे? त्यातून स्थानिक लोकांची देखील त्यांना साथ असते, अर्थात त्याशिवाय असा हिंसाचार अवघड म्हणा. आता हा प्रश्न जागतिक झाला आहे. त्यातून त्या देशाची घटना अशी असते, सरसकट अटकसत्र राबवता येत नाही कारण सुक्याबरोबर ओले जळण्याची भीती. ओले जळले की लगेच मीडिया कान टवकारून टीका करायला मोकळे! दिवसेंदिवस हा प्रश्न अतिशय जटील होत चाललेला आहे. आज शेजारचा देश जळत आहे म्हणून दुर्लक्ष करणे, परवडणारे नाही. उद्या आपल्या देशात अशी परिस्थिती उद्भवू शकते. मुळात, "Easy Money" चा हव्यास प्रत्येक पावलावर नडतो आणि त्यातून गुन्हेगारी बोकाळत जाते. प्रत्येक देशाची घटना स्वतंत्र असते आणि घटना बदल करायला, कुठलेच सरकार शक्यतो धजावत नाही कारण राजकारणात त्यांना देखील स्थिर व्हायचे असते. स्थलांतरितांच्या प्रश्नांचे असंख्य कंगोरे आहेत आणि प्रत्येक टप्प्यावर असंख्य अडथळे आहेत., हेच खरे.

Tuesday 16 May 2023

(विस्कळीत) झिम्मा - विजया मेहता

मुळात केवळ मराठी भाषेतच नव्हे तर इतर भाषेत देखील, कलावंतांनी लिहिलेली आत्मचरित्रे तशी विरळाच वाचायला मिळतात (इथे लेखक/कवी यांना वगळले आहे कारण त्यांचा लेखन हाच धर्म असतो!!) त्यामुळे, एकंदर कलेबाबत आणि त्या कलेच्या सादरीकरणाबाबत जे मुळातले अस्पर्शी गोंधळी समज असतात, ते आणखी दृढावत जातात, उदाहरणार्थ सी. रामचंद्र यांचे "माझ्या जीवनाची सरगम" अत्यंत टुकार लेखन!! या पार्श्वभूमीवर विजय मेहता यांचे आत्मचरित्र वाचायला घेतले आणि वाचन संपल्यावर मनात अनेक प्रश्न उभे राहिले. वास्तविक, मराठी नाट्यसृष्टीत विजयाबाईंचे नाव प्रतिष्ठीत, पुढे चित्रपट क्षेत्र जरी गाजवले नाही तरी कामगिरी उल्लेखनीय, मराठी नाटक परदेशी नेण्यात - विशेषत: पूर्व जर्मनी इथे नेण्यात त्यांचा मोठा हातभार, रंगायन सारखी अभिनव चळवळ आणि त्यातील प्रयोग, मराठी साहित्यावर आधारित नाट्यप्रयोग (यात जयवंत दळवींचा देखील तितकाच सहभाग!!) एक अजोड अभिनेत्री आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पारंपारिक अभिनय शैली मोडून नवीन शैली निर्माण करणे इत्यादी अनेक गोष्टी त्यांच्या नावावर मांडता येतात. अशा समृध्द पार्श्वभूमीवर "झिम्मा" वाचायला घेतले. आयुष्याचा आवाका प्रचंड असल्याने, लिखाण देखील तितकेच समृद्ध असणार, आपण वाचायला घेतो. आपण, आत्मचरित्र का लिहितो? तितकी आपली योग्यता असते का? तसे पहिले तर समाजातील प्रत्येक व्यक्ती आत्मचरित्राचा विषय ठरू शकते पण तरीही, तसे कुणी फारसे धाडस करीत नाही. याचे प्रमुख कारण असे दिसते, सामान्य माणूस मुळात बुजरा असतो आणि आत्मचरित्र लिहायचे म्हणजे हातून तशी काहीतरी कामगिरी होणे आवश्यक!! दुसरा भाग असा, जे कुणी असामान्य कामगिरी करतात, त्यांच्या आयुष्याबद्दल सामान्यांना बरेच कुतूहल वाटत असते आणि त्या कुतुहलाचे उत्तर, ते आत्मचरित्रातून शोधण्याचा प्रयत्न करतात. या दृष्टीने बघायला गेल्यास विजयाबाईंचे बहुतेक सगळे आयुष्य चकचकाटी प्रकाशात गेले!! सामान्य लोकांना झगझगाट लगेच मोहून टाकतो. या आत्मचरित्रात, प्रमुख दोष आढळतो, सगळ्या पुस्तकभर घटनांची जंत्री मांडलेली आहे. आता, आयुष्याचा पट शब्दबद्ध करायचा म्हणजे घटना येणारच परंतु बऱ्याचवेळा घटनांचा फक्त उल्लेख वाचायला मिळतो. उदाहरणार्थ, रंगायन हि मराठी रंगभूमीवरील अभिनव चळवळ होती. रंगायनने अनेक, नव्या गोष्टी/प्रघात मराठी रंगभूमीवर आणले. नव्या जाणीवा, नवे सादरीकरण, विषयात वैविध्य, समाजात घडत असणाऱ्या प्रवृत्तींचे थेट रंगावृत्ती दर्शन इत्यादी. या चळवळीचे म्होरकेपण विजया बाईंनी घेतले पण पुढे त्यात मतभेद झाले आणि रंगायनचे तारू फुटले, हा इतिहास झाला. आता, या इतिहासाचे विश्लेषण कुठेच वाचायला मिळत नाही!! केवळ काही परिच्छेदात आणि ते देखील, काही प्रमाणात अरविंद देशपांडे, विजय तेंडूलकर यांच्यावर दोषारोप करून प्रकरण संपविले आहे!! जणू काही त्यात स्वत:चा काहीही दोष नव्हता!! असे समजून चालू, त्यांचा काहीच दोष नव्हता, पण जर का इतरांचा संपूर्ण दोष होता, तर त्याचे व्यवस्थित विवरण नको का? इथेच आत्मचरित्र हे आत्मसमर्थनाच्या अंगाने जायला लागते. पुस्तकात, पुढे अनेक ठिकाणी रंगायनचा उल्लेख आणि त्याचे योगदान,याबद्दल विवेचन आहे. म्हणजे रंगायन चळवळीचा प्रभाव पुढील आयुष्यावर देखील पडला होता, हे अप्रत्यक्षरीत्या मान्य केले आहे. असे असताना, ही चळवळ का अस्तंगत झाली? या प्रश्नाचे कुठेच समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्याआधी, त्यांनी अल्काझी आणि मर्झबान यांच्याकडे अभिनयाचे आणि दिग्दर्शनाचे धडे घेतले, पण नक्की कशाप्रकारचे प्रशिक्षण घेतले, याचा संगतवार धांडोळा घेतलेला नाही. केवळ, हे माझे गुरु, असेच उल्लेख वाचायला मिळतात!! वास्तविक पाहता, अल्काझींचे योगदान केवळ विजयाबाई(च) नव्हे तर पुढील अनेक पिढ्या मोकळेपणाने मान्य करतात. असे असताना, तुम्ही तर कारकिर्दीच्या प्राथमिक काळात अल्काझी यांच्याकडे गेला असताना, त्यांचे कुठले संस्कार तुमच्यावर घडले, याबाबत काहीही वाचायला मिळत नाही. ते सविस्तर येण्याची गरज होती कारण त्या संस्कारांना धरूनच, विजयाबाईंनी पुढील उभारणी केली. आत्मचरित्र लिहिताना, सगळा व्यापार हा पाठीला डोळे लावून अवलोकायचा प्रकार असतो आणि आपण आज जिथे आहोत, तिथपर्यंतचा प्रवास कसा झाला, याचा मागोवा घेण्याचा असतो, मग तिथे चिकित्सक वृत्ती, अभ्यासू मनोवृत्ती आणि वस्तुनिष्ठता आवश्यक असते. बऱ्याच ठिकाणी वस्तुनिष्ठतेचा "आव"आणला आहे परंतु अखेर निराशाच हाती येते. वास्तविक पहाता, आत्मचरित्र हे नेहमीच मागील आयुष्याकडे त्रयस्थ नजरेतून बघून, केवळ कौतुक नव्हे तर दोषांचा उहापोह करण्याची सुंदर संधी असते. बरे असे नाव्हे, आज बाईंनी काही चुका कबूल केल्या तर त्यांच्यावर काही लांच्छन येईल!! मुळात बाईंचे कर्तृत्व इतके व्यापक आहे की काही चुका दर्शविल्या तर त्यांच्या आयुष्यात काही कमतरता येऊ शकते. हे केवळ रंगायन बाबत आहे, अशातला भाग नाही. पुढे व्यावसायिक झाल्यावर, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक नाटकांचे उल्लेख आणि प्रसंगी विस्तारपूर्वक प्रकरणे आहेत. म्हणजे, "जास्वंदी", "महासागर", "पुरुष","संध्याछाया" इत्यादी सगळ्या नाटकांबद्दल माहिती मिळते, पण ती सगळी जंत्रीच्या स्वरुपात!! कुठेही, दिग्दर्शक म्हणून नेमके काय फेरफार केले, त्यामागे कुठली वैचारिक भूमिका होती, याबद्दल फारसे काही वाचायला मिळत नाही. वास्तविक नाटकाचा दिग्दर्शक म्हणजे कलाकृतीचा कप्तान!! जे लेखकाने लिहिले आहे, त्यातील नेमके नाट्य जाणून, त्याची रंगावृत्ती तयार करणे, हा प्रचंड व्यामिश्रतेचा भाग आहे, त्यामागे कितीतरी वैचारिक संघटन असते, आणि तेच नेमके वाचायला मिळत नाही. वाचायला मिळते ती, त्या नाटकानिमित्ताने झालेल्या घटनाची जंत्री!! इथे एक किस्सा आठवला. जयवंत दळवींनी, एका पुस्तकात विजयाबाईंवर लेख लिहिला आहे. त्यात लिहिताना, विजयबाईनी "संध्याछाया" नाटक बसवताना, त्यातील "बयो" व्यक्तिरेखा बसवताना, त्यांची (विजयाबाईंची) आजी कशी मिसळली, हे दळवींना सांगितल्याचे, विस्तारपूर्वक लिहिले आहे. खरंतर हे आणि असे किस्से, आत्मचरित्रात येणे गरजेचे होते. आता तर घटनांच्या जंत्री, कुणालाही गुगलवरून प्राप्त होऊ शकतात, अशी परिस्थिती असताना, त्याच घटना सलग मांडून नक्की काय साधले? दोन तीन ठिकाणी, दिग्दर्शक म्हणून लेखकाकडून आवश्यक ते बदल करवून घेतले, असे उल्लेख!! पण ते बदल का करून घेतले, त्याची काय आवश्यकता होती, त्याने सादरीकरणात काय आणि किती फरक पडला, हे प्रश्न तसेच मनात राहतात!! पुढे, पाश्चात्य लोकांशी गाठीभेटी झाल्या, त्या निमित्ताने सांस्कृतिक आदानप्रदान झाले, या सगळ्या घटनांचे विस्तारपूर्वक उल्लेख आहेत. एक इतिहास म्हणून योग्यच आहे पण मग पुढे प्रश्न असा उद्भवतो, या गाठीभेटीतून नेमका काय फायदा झाला तसेच विशेषत: जर्मनी, नंतर अमेरिका देखील, यांच्या जाणीवा, सादरीकरण आणि आपल्या संकल्पना यात नेमका काय फरक? याचे उत्तर मिळत नाही. इथे विजयाबाईंना एक संधी होती, पाश्चत्य रंगभूमी आणि भारतीय रंगभूमी याचा तुलनात्मक अभ्यास करण्याची. तसा त्यांनी अभ्यास नक्कीच केला असणार पण मग त्या अभ्यासाचे प्रतिबिंब आत्मचरित्रात पडत नाही. सगळे उल्लेख जंत्रीवजा येतात. आता विजयाबाई जर्मनी, अमेरिका इथे गेल्या होत्या, ही घटना जगजाहीर आहे. असे धरून चालू, त्यांच्या तुलनेत भारतीय रंगभूमी मागासलेली आहे किंवा कमअस्सल आहे. असे असेल तर मग सुधारणा करण्याची कितीतरी मोठी संधी प्राप्त झाली होती. असेही असू शकेल, त्यांना सुधारणा करण्याची संधी मिळाली नसेल. कारणे अनेक असू शकतात, जसे आर्थिक पाठिंब्याचा अभाव असणे, तुलनेने कम सक्षम अभिनेते असणे, इत्यादी. त्यांचा उल्लेख करायला काय हरकत होती. बाईंचा रंगभूमीवर इतका दबदबा आहे की त्यांनी मराठी रंगभूमीवरील त्रुटींचा उल्लेख केला तर त्याचा फार मोठा नकारार्थी गवगवा होईलच असे नाही आणि समजा झाला तर रंगभूमीच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगलाच झाला असता. बाईंनी इथे फार मोठी संधी गमावली, असे वाटते. तसेच, पूर्वीच्या अभिनेत्यांबरोबर काम करताना, (म्हणजे नानासाहेब फाटक, मास्टर दत्ताराम, केशवराव दाते इत्यादी!!) आपल्याला कसे जुळवून घ्यावे लागले, किंवा त्यांच्या अभिनयातील बारकावे, कच्चे दुवे याबद्दल अवाक्षर देखील नाही!! खरे पाहता, अल्काझी आणि मर्झबान यांच्याकडून आधुनिक तंत्र शिकून, मराठी रंगभूमीवर पाऊल टाकले. तेंव्हा अभिनय शैलीत फरक असणारच, तसा पुढे थोडाफार उल्लेख देखील आहे पण तितकाच. त्यावर वैचारिक काहीही नाही!! पूर्वीच्या नटांना कुचेष्टेने "आवाजी" अभिनेते म्हणून खिजवले जाते पण त्यात किती अर्थ आहे? एक अभ्यासू अभिनेत्री म्हणून काही स्पष्ट विश्लेषण यायला काही हरकत नव्हती. बरे आता मागील पिढीतील कुणीही जिवंत नाहीत तेंव्हा त्यांच्याकडून वादग्रस्त टीका होण्याचा अजिबात संभव नव्हता. नंतर, NCPA प्रकरण!! त्यामागची टाटांची मनोभूमिका, त्यानुसार झालेले बांधकाम आणि मुळात त्या निर्मितामागील विचार, याचे सुसंगत वर्णन वाचायला मिळते. त्यांच्याआधी तिथे पु.ल. देशपांडे अध्यक्ष होते, त्याआधी भाभा!! परंतु त्यांच्या कार्याबद्दल फारसे काहीही वाचायला मिळत नाही. एकेठिकाणी पु.ल. देशपांडे यांनी केलेल्या कार्यक्रमांची थोडक्यात माहिती दिली आहे पण पुढे तसे कार्यक्रम खंडित झालें, हे पूर्णसत्य आहे. का खंडित झाले? आपली मनोभूमिका वेगळी होती म्हणून तसे कार्यक्रम खंडित झाले तर तसे स्पष्टपणे लिहायला हवे होते. त्यात काहीही वावगे नाही. पुढे NCPA संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करताना, स्वतःचे म्हणून काही निर्माण करताना, काय विचार केला होता? निर्मिती ही नेहमीच विचारांची मागणी करते आणि बाई तर सतत विचारांच्या कोंडाळ्यात वावरणाऱ्या!! असे असताना, आपला वैचारिक प्रवास कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर कुठेही मिळत नाही. हे आणि असे अनेक प्रश्न वाचताना मनात येतात आणि शेवटी, पुस्तक वाचून मनात असमाधानच येते. हे सगळे सविस्तर लिहावेसे वाटले कारण, बाईंचे कर्तृत्व तितक्या तोलामोलाचे आहे म्हणून. सगळ्याच कलाकारांबाबत अशी अपेक्षा ठेवता येत नाही. इतिहास म्हणून पुस्तक चांगले आहे परंतु आत्मचरित्र म्हणून निराशा करणारे आहे.